Total Pageviews

Thursday, January 13, 2011

'पानिपत १७६१’ - त्र्यं. शं. शेजवलकर

                 मराठे हिंदुस्थानाचे राज्यकर्ते म्हणून वागत होते, केवळ लुटारू म्हणून दुस-या लुटारूंशी लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावयाचे किंवा रहावयाचे याबद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठी पानिपतास लढले. परक्या अब्दालीला येथे कोणताच नैतिक हक्क नाही, असे त्यांचे आव्हान होते. पेशव्याने १७५२ च्या अहदनाम्याने सहा सुभ्यांच्या चौथाईच्या बदल्यांत दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण अबदालीपासून करण्याचे कार्य अंगावर घेतले होते. ते कार्य त्याने यथाशक्य पुढे चालविले. अब्दालीला दिल्लीतून व पंजाबांतून हुसकून, एकवार तरी त्याला अटकेपार घालवून, मुलतान व पंजाब येथील कारभार वर्षभर त्यांनी केला. नंतर आलमगीर बादशहाने भाऊस फर्मान पाठवून स्वत:च्या रक्षणास बोलाविले. त्याप्रमाणे भाऊ दिल्लीस येऊन त्याने अबदालीचा हस्तक घालवून मृत बादशहाचा मुलगा बादशहा म्हणून जाहीर केला एवढेच नव्हे तर त्याला साफ बुडविण्यासाठी कंबर कसली. बादशहास न जुमानणाऱ्या हिंदु व मुसलमान संस्थानिकांवर त्यांनी सारखे शस्त्र धरिले.

                            एवढे सारे त्यांनी आपण दिलेल्या शब्दासाठी व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एकटय़ाने दुस-याच्या मदतीशिवाय  केले. मोगलांच्या ताब्यांतून गेलेले  काबूल व कंदाहार हे अटकेपारचे दोन सुभेसुद्धा त्यांनी अबदालीला देऊन टाकले नाहीत. मोगल साम्राज्याचा भाग म्हणून राखण्याचेच त्यांनी ठरविले व यासाठीच पानिपताचा पराभव आपणांवर ओढवून घेतला. त्यांच्याप्रमाणे एक लाख स्वार तयार ठेवण्याचे सामथ्र्य दुस-या कोणत्याही सत्ताधीशाने त्या काळी दाखविले नाही. धार्मिक बाबतीत ते हिंदु- मुसलमान असा भेद करून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत कोठे धर्मवेडेपणाही दाखविला नाही. क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत- मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतु साध्य केला नाही. युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कैद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे अकारण कापून त्यांच्या राशी घालण्याचा वा ती भाल्यावर मिरविण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरिला नाही. नादिरशहा किंवा अब्दाली यांच्याप्रमाणे नागरिकांचे अनन्वित हाल करून त्यांनी पैसा उकळला नाही. आणि एवढे सर्व असूनही वरील सर्व गोष्टी करणारांविरुद्ध त्यांस अपयश आले, यावरून अशा गोष्टी न केल्यामुळेच त्यांचा पराजय झाला, असे म्हणावयाचे काय? आणि तरीही त्यांना सर यदुनाथांसारखे शिष्ट इतिहासकार कृमिकीटकांप्रमाणे धर्मविहीन म्हणून संबोधतांना आढळतात? तेव्हा त्यांचा उच्चनीच ठरविण्याचा मानदंड तरी कोणता, असे विचारावेसे वाटते. या लोकांना आम्ही एकच सांगू इच्छितो की, आजही पुष्कळ मराठे- बहुसंख्य मराठे- असेच मानताना आढळतील की, क्लाइव्ह किंवा नजीब किंवा अबदाली यांचा मार्ग आचरण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी साम्राज्य घालविले, हीच चांगली गोष्ट झाली!
                      मराठय़ांच्या पराभवाचे आणखी एक कारण असे दिसते की, अठराव्या शतकांतील अफगाणांप्रमाणे ते भटके राहिले नव्हते. प्राचीन काळी लोकसंख्या थोडी होती, तेव्हा मनुष्यजातीची एक टोळी दुसरीचा पराभव करून तिला आपल्या रहात्या प्रदेशातून पार हाकून देऊ शकत असे. मनुष्यजातीचे संचलन मुख्यत: याच कारणामुळे इतिहासात घडले आहे. अठराव्या शतकापर्यंत हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील मुसलमानी प्रदेशांत हा प्रकार चालू होता. नादिरशहाने अब्दाली या बंडखोर टोळीस  कंदाहारच्या आसंमतातून उठवून तिला खोरासान प्रांतात जावयास लावले व तिच्यातील पुरुष गुलाम करून आपले सैनिक बनविले. याच टोळीने नादिरशहाचा खून झाला तेव्हा अहमदशहाच्या नेतृत्वाखाली पलायन करून ती पुन: आपल्या मूळ प्रदेशांत आली. या गोष्टीमुळे अब्दालीच्या अफगाण सैन्यांतील लोक जास्त संचलनशील झाले व राहिले होते; आणि असे लोक स्थिरपद झालेल्या शेतक-यांच्या  राष्ट्राला केव्हाही भारी ठरतात, असा इतिहासाचा धडा आहे. मुख्यत: धर्माच्या रक्षणासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठय़ांनी क्षत्रियकाय अंगीकारिले होते, तरी मराठय़ाला आपल्या शेतावर व मुलांमाणसांत घरी बसण्यात जे समाधान वाटते, ते घराबाहेर भटकण्यात वाटत नव्हते, हे शंभर वर्षांचा त्यांचा इतिहास बोलतो. वर्षांतून काही काळ घराबाहेर राहण्याची सवय त्यांनी पानिपतकाळी केली होती, तरीही चरितार्थ चालविण्याची ती एक सोय असेच मराठे मानीत. सगळीकडे रक्त सांडीत हिंडण्यात त्यांना आनंद नव्हता. मराठय़ांसारख्या अगदी कमी रक्तपाताच्या मोहिमा कोणीच केल्या नसतील. पोटापुरते पैसे मिळाले की, नंतर शत्रूचा अगदी नायनाट किंवा कायम बंदोबस्त करण्याची त्यास घृणा वाटे. ते घरी परतण्यासाठी उत्सूक असत. युद्ध ही एक न टाळण्यासारखी आपल्या पोटाच्या धंद्यातील बाब, असेच ते समजत. आपले शक्य तितके कमी लोक मरावेत, हे जसे त्यांस वाटे, तसे इतरही उगाच मारू नयेत, असाही त्यांचा भाव होता; यामुळेच पानिपताच्या युद्धात पराभव झाल्यानंतर जी अकारण अमानुष कत्तल दुराम्यांनी केली, ती मराठय़ांच्या मनाला फार लागली. इतकी की, ‘पानिपत’ हा शब्द तत्काळ त्या विशिष्ट अर्थाने त्यांच्या भाषेत रूढ झाला. सन १७६६ च्या एका पत्रात ‘वाबले, बुले, राजवले, लांभाते यांसि दुसरे पाणपत जाले’ असे उद्गार काढलेले आढळतात.
                      या आज्ञेप्रमाणे मुकाबला करण्यासाठीच गुरू गोविंदसिंहाने शिखांना शस्त्रधारी बनविले. हिंदी राजकारणात शस्त्रधारणाचा हा जो धार्मिक दुरुपयोग केला जात होता तो थांबविण्यासाठी मराठय़ांनी स्वत: शस्त्र हातात घेतले. त्याखेरीज अन्य मार्ग दिसत नव्हता म्हणूनच त्यांनी या मार्गाचा अवलंब केला. एरवी उठल्यासुटल्या शस्त्राघात करण्याकडे  त्यांची नैसíगक प्रवृत्ति नव्हती. चिनी प्रवासी युआनच्वांग याने मराठय़ांचे हे एक वैशिष्टय़ म्हणूनच सांगितले आहे. अपमानाच्या भरपाईसाठीच ते शस्त्रधारण करतात, असे त्याने म्हटले आहे. अलीकडील काळात त्यांचा गनिमी कावा म्हणून जी युद्धपद्धति रुढ झाली, तिचाही  हेतू प्रत्यक्ष रक्तपाताशिवाय डावपेचानेच इष्टकार्य साधण्याचा होता. ही पद्धति सोडून यवनांची पद्धति स्वीकारली, हाच भाऊवर नाना फडणिसासारख्यांचासुद्धा आक्षेप आहे. ज्या युद्धात शेवट अकारण रक्तपातात होतो असे युद्ध त्यास नको होते.
                  ते कसेही असो. पानिपताबद्दल बोलावयाचे तर असे कबूल करणे भाग आहे की, भौतिकदृष्टय़ा मराठय़ांचा उणेपणा या लढाईने उघडा पडला, पण नीतिदृष्टय़ा पहाता त्यांचे वर्तन आक्षेप न घेण्यासारखे अगदी स्वच्छ आहे. हॉब्ज या इंग्रज राजनीतिशास्त्रकाराच्या विवेचनाकडे पाहिले तर युद्धे तीन गोष्टींसाठी होत असतात. भौतिक फायदा, भीति व कीर्ति या त्या गोष्टी होत. अर्थात हे वर्गीकरण मागासलेल्या जगाला शोभण्यासारखे आहे. अबदालीशी लढण्याचा निश्चय करण्यात मराठय़ांचा आर्थिक फायदा नव्हता, अफगाणांचे भयही त्यांना बाधत नव्हते, तसेच केवळ कीर्तीसाठी युद्ध करण्यास ते कधीच तयार झाले नसते. भाऊ- बखरकाराने परतूडचा वाद रंगविताना भाऊसाहेबांच्या तोंडी  मर्यादा सोडून केलेले उत्तर म्हणून ‘एवढे कर्म हे कीर्तीसाठी करावे’ असे शब्द घातले आहेत; पण ते येथे लागू पडण्यासारखे नाहीत, कारण भाऊ हा कीर्तीसाठी काहीही करू म्हणणारा नव्हता. राज्यरक्षणासाठी आवश्यक, मराठय़ांच्या राज्याचे आर्थिक नुकसान बंद पाडण्यासाठी जरूर, म्हणूनच उत्तरेकडील मोहीम त्याने स्वीकारली असावी. मग मराठे कशासाठी लढले म्हणावयाचे? अशासाठी की, दिल्लीची  पातशाही राखण्याचे जे कार्य त्यांनी करार करून अंगावर  घेतले होते, ते पार पाडण्यासाठी; आणि या वेळी अबदालीसुद्धा वर सांगितलेल्या तीन प्राथमिक कारणांसाठी लढण्यास उद्युक्त झालेला नसून, एका उच्च व त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठी तो हिंदुस्थानात हाल सोसून  राहिला होता. हे कर्तव्य हिंदुस्थानातील इस्लामचे रक्षण हेच होय. त्याजवळ असलेल्या वरचढ सामर्थ्यांमुळे त्याने जय मिळवून कीर्ति संपादली व मराठय़ांच्या भीतीपासून स्वत:स कायमचे मुक्त करून घेतले; पण आर्थिकदृष्टय़ा त्यास ही कर्तव्यपूर्ति महागातच पडली, हे परिणामावरून दिसते.

No comments:

Post a Comment