Total Pageviews

Tuesday, January 25, 2011

प्रजासत्ताक दिन का सुनहरा अवसर

नमामि मातु भारती!



हिमाद्रि-तुंग-शृंगिनी
त्रिरंग-अंग-रंगिनी
नमामि मातु भारती
सहस्त्र दीप आरती।
 

समुद्र-पाद-पल्लवे
विराट विश्व-वल्लभे
प्रबुद्ध बुद्ध की धरा
प्रणम्य हे वसुंधरा।

स्वराज्य-स्वावलंबिनी
सदैव सत्य-संगिनी
अजेय श्रेय-मंडिता
समाज-शास्त्र-पंडिता।

अशोक-चक्र-संयुते
समुज्ज्वले समुन्नते
मनोज्ञा मुक्ति-मंत्रिणी
विशाल लोकतंत्रिणी।

अपार शस्य-संपदे
अजस्त्र श्री पदे-पदे
शुभंकरे प्रियंवदे
दया-क्षमा-वंशवदे।

मनस्विनी तपस्विनी
रणस्थली यशस्विनी
कराल काल-कालिका
प्रचंड मुँड-मालिका।

अमोघ शक्ति-धारिणी
कुराज कष्ट-वारिणी
अदैन्य मंत्र-दायिका
नमामि राष्ट्र-नायिका।

- गोपाल प्रसाद व्यास


हर वर्ष 26 जनवरी एक ऐसा दिन है जब प्रत्‍येक भारतीय के मन में देश भक्ति की लहर और मातृभूमि के प्रति अपार स्‍नेह भर उठता है। ऐसी अनेक महत्‍वपूर्ण स्‍मृतियां हैं जो इस दिन के साथ जुड़ी हुई है। यही वह दिन है जब जनवरी 1930 में लाहौर ने पंडित जवाहर लाल नेहरु ने तिरंगे को फहराया था और स्‍वतंत्र भारतीय राष्‍ट्रीय कांग्रेस की स्‍थापना की घोषणा की गई थी।
26 जनवरी 1950 वह दिन था जब भारतीय गणतंत्र और इसका संविधान प्रभावी हुए। यही वह दिन था जब 1965 में हिन्‍दी को भारत की राजभाषा घोषित किया गया।
------------------------------------------------------------------------------------------
"सभी राष्‍ट्रों के लिए एक ध्‍वज होना अनिवार्य है। लाखों लोगों ने इस पर अपनी जान न्‍यौछावर की है। यह एक प्रकार की पूजा है, जिसे नष्‍ट करना पाप होगा। ध्‍वज एक आदर्श का प्रतिनिधित्‍व करता है। यूनियन जैक अंग्रेजों के मन में भावनाएं जगाता है जिसकी शक्ति को मापना कठिन है। अमेरिकी नागरिकों के लिए ध्‍वज पर बने सितारे और पट्टियों का अर्थ उनकी दुनिया है। इस्‍लाम धर्म में सितारे और अर्ध चन्‍द्र का होना सर्वोत्तम वीरता का आहवान करता है।"


"हमारे लिए यह अनिवार्य होगा कि हम भारतीय मुस्लिम, ईसाई, ज्‍यूस, पारसी और अन्‍य सभी, जिनके लिए भारत एक घर है, एक ही ध्‍वज को मान्‍यता दें और इसके लिए मर मिटें।"


- महात्‍मा गांधी
----------------------------------------------------------------------------------------------------------------


भारत के प्रथम राष्‍ट्रपति डॉ. राजेन्‍द्र प्रसाद ने 26 जनवरी 1950 को 21 तोपों की सलामी के बाद भारतीय राष्‍ट्रीय ध्‍वज को फहराकर 59 वर्ष पहले भारतीय गणतंत्र के ऐतिहासिक जन्‍म की घो‍षणा की थी। अंग्रेजों के शासनकाल से छुटकारा पाने के    आठ सौ चौरान्यवें (894) दिन बाद हमारा देश गणतंत्र राज्‍य बना। तब से आज तक हर वर्ष राष्‍ट्रभर में बड़े गर्व और हर्षोल्लास के साथ गणतंत्र दिवस मनाया जाता है।


लगभग 2 दशक पुरानी यह यात्रा थी जिसे सन् 1930 में एक सपने के रूप में संकल्पित किया गया था और हमारे भारत के शूरवीर क्रांतिकारियों ने सन् 1950 में इसे एक स्वतंत्रता के रूप में साकार किया। तभी से धर्मनिरपेक्ष और लोकतांत्रिक राष्‍ट्र के रूप में भारत का निर्माण एक ऐतिहासिक घटना रही।


यह भी कहा जाता है कि 31 दिसंबर 1929 की मध्‍य रात्रि में भारतीय राष्‍ट्रीय कांग्रेस के लाहौर सत्र के दौरान राष्‍ट्र को स्वतंत्र बनाने की पहल की गई थी। इस सत्र की अध्यक्षता पंडित जवाहरलाल नेहरू ने की थी। उस बैठक में उपस्थित सभी क्रांतिकारियों ने अंग्रेज


सरकार के कब्जे से भार‍त को आजाद करने और पूर्णरूपेण स्‍वतंत्रता को सपने में साकार करके 26 जनवरी 1930 को 'स्‍वतंत्रता दिवस' के रूप में एक ऐतिहासिक पहल बनाने की शपथ ली थी। भारत के उन शूरवीरों ने अपनी लक्ष्य पर खरे उतरने की भरकस


कोशिश करते हुए इस दिन को स्वतंत्रता के रूप में सार्थक मनाने के प्रति एकता दर्शाई और भार‍त सचमुच स्वतंत्र देश बन गया। उसके बाद भारतीय संविधान सभा की बैठकें होती रहीं, जिसकी पहली बैठक 9 दिसंबर 1946 को हुई, जिसमें भारतीय नेताओं और अंग्रेज कैबिनेट मिशन ने भाग लिया। भारत को एक संविधान देने के विषय में कई चर्चाएँ, सिफारिशें और वाद-विवाद किया गया। कई बार संशोधन करने के पश्चात भारतीय संविधान को अंतिम रूप दिया गया जो 3 वर्ष बाद यानी 26 नवंबर 1949 को आधिकारिक रूप से अपनाया गया।


इस अवसर पर डॉ. राजेन्‍द्र प्रसाद ने भारत के प्रथम राष्‍ट्रपति के रूप में शपथ ली। हालाँकि भारत 15 अगस्‍त 1947 को एक स्‍वतंत्र राष्‍ट्र बन चुका था, लेकिन इस स्‍वतंत्रता की सच्‍ची भावना को प्रकट किया तथा 26 जनवरी 1950 को। इर्विन स्‍टेडियम जाकर राष्‍ट्रीय ध्‍वज फहराया गया और गणतंत्र के रूप में सम्मान देकर भारतीय संविधान प्रभावी हुआ। 

Monday, January 24, 2011

पुलंनी घेतलेली भीमसेनजींची मुलाखत

पु. ल. देशपांडे यांनी  पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग.


.........
पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉर्डिंग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉर्डिंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.

भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.

आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं. आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?

भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही त-हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)

Thursday, January 13, 2011

पानिपत युद्धाचे केलेले समीक्षण - मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे

              पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण! २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो..


              देशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिस-या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
               दुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.
              १४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.
             पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!
युद्धविजयी घटक
            प्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिका-यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणा-या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.
लढाईपूर्व घटना 
               जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.
             १७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.
                संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.
पानिपतमधील मोर्चाबंदी
               भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात  ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.
                  मराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.
त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला.  गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ लागले. डिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!
व्यूहरचना आणि रणनीती
                    दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.
                 मराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी! त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजा उद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.
                     मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी  काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.
निर्णायक लढाई
                   अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका  भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.
                 दुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबा-या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणा-या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.
                    सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास!
युद्धतत्त्वांच्या निकषांवर परीक्षण
                    युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत. या निकषांवर तिस-या  लढाईचे परीक्षण-
                    उद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)- याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.
                      सुरक्षितता (Security)- सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.
                      इच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)- मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.
                     विस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)-  अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.
                    सैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of  Force)- युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.
                  सैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of  Force)- अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.
                  लवचिकता (Flexibility)- नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.
                   सहकार्य (Co-operation)- सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.
                  व्यवस्थापन (Administration)- हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.
निर्णायक वळणे
                        पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील.  
पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार.
दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन.
तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी.
चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि
पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.
                     सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर ब-याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.
                  पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर  मराठी झेंडा फडकला असता.
                  पानिपतची लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.       

(संदर्भ - प्रस्तुत लेख हा 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रात  रविवार, ९ जानेवारी  २०११ रोजी प्रकाशित झाला होता.)

'पानिपत १७६१’ - त्र्यं. शं. शेजवलकर

                 मराठे हिंदुस्थानाचे राज्यकर्ते म्हणून वागत होते, केवळ लुटारू म्हणून दुस-या लुटारूंशी लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावयाचे किंवा रहावयाचे याबद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठी पानिपतास लढले. परक्या अब्दालीला येथे कोणताच नैतिक हक्क नाही, असे त्यांचे आव्हान होते. पेशव्याने १७५२ च्या अहदनाम्याने सहा सुभ्यांच्या चौथाईच्या बदल्यांत दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण अबदालीपासून करण्याचे कार्य अंगावर घेतले होते. ते कार्य त्याने यथाशक्य पुढे चालविले. अब्दालीला दिल्लीतून व पंजाबांतून हुसकून, एकवार तरी त्याला अटकेपार घालवून, मुलतान व पंजाब येथील कारभार वर्षभर त्यांनी केला. नंतर आलमगीर बादशहाने भाऊस फर्मान पाठवून स्वत:च्या रक्षणास बोलाविले. त्याप्रमाणे भाऊ दिल्लीस येऊन त्याने अबदालीचा हस्तक घालवून मृत बादशहाचा मुलगा बादशहा म्हणून जाहीर केला एवढेच नव्हे तर त्याला साफ बुडविण्यासाठी कंबर कसली. बादशहास न जुमानणाऱ्या हिंदु व मुसलमान संस्थानिकांवर त्यांनी सारखे शस्त्र धरिले.

                            एवढे सारे त्यांनी आपण दिलेल्या शब्दासाठी व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एकटय़ाने दुस-याच्या मदतीशिवाय  केले. मोगलांच्या ताब्यांतून गेलेले  काबूल व कंदाहार हे अटकेपारचे दोन सुभेसुद्धा त्यांनी अबदालीला देऊन टाकले नाहीत. मोगल साम्राज्याचा भाग म्हणून राखण्याचेच त्यांनी ठरविले व यासाठीच पानिपताचा पराभव आपणांवर ओढवून घेतला. त्यांच्याप्रमाणे एक लाख स्वार तयार ठेवण्याचे सामथ्र्य दुस-या कोणत्याही सत्ताधीशाने त्या काळी दाखविले नाही. धार्मिक बाबतीत ते हिंदु- मुसलमान असा भेद करून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत कोठे धर्मवेडेपणाही दाखविला नाही. क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत- मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतु साध्य केला नाही. युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कैद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे अकारण कापून त्यांच्या राशी घालण्याचा वा ती भाल्यावर मिरविण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरिला नाही. नादिरशहा किंवा अब्दाली यांच्याप्रमाणे नागरिकांचे अनन्वित हाल करून त्यांनी पैसा उकळला नाही. आणि एवढे सर्व असूनही वरील सर्व गोष्टी करणारांविरुद्ध त्यांस अपयश आले, यावरून अशा गोष्टी न केल्यामुळेच त्यांचा पराजय झाला, असे म्हणावयाचे काय? आणि तरीही त्यांना सर यदुनाथांसारखे शिष्ट इतिहासकार कृमिकीटकांप्रमाणे धर्मविहीन म्हणून संबोधतांना आढळतात? तेव्हा त्यांचा उच्चनीच ठरविण्याचा मानदंड तरी कोणता, असे विचारावेसे वाटते. या लोकांना आम्ही एकच सांगू इच्छितो की, आजही पुष्कळ मराठे- बहुसंख्य मराठे- असेच मानताना आढळतील की, क्लाइव्ह किंवा नजीब किंवा अबदाली यांचा मार्ग आचरण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी साम्राज्य घालविले, हीच चांगली गोष्ट झाली!
                      मराठय़ांच्या पराभवाचे आणखी एक कारण असे दिसते की, अठराव्या शतकांतील अफगाणांप्रमाणे ते भटके राहिले नव्हते. प्राचीन काळी लोकसंख्या थोडी होती, तेव्हा मनुष्यजातीची एक टोळी दुसरीचा पराभव करून तिला आपल्या रहात्या प्रदेशातून पार हाकून देऊ शकत असे. मनुष्यजातीचे संचलन मुख्यत: याच कारणामुळे इतिहासात घडले आहे. अठराव्या शतकापर्यंत हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील मुसलमानी प्रदेशांत हा प्रकार चालू होता. नादिरशहाने अब्दाली या बंडखोर टोळीस  कंदाहारच्या आसंमतातून उठवून तिला खोरासान प्रांतात जावयास लावले व तिच्यातील पुरुष गुलाम करून आपले सैनिक बनविले. याच टोळीने नादिरशहाचा खून झाला तेव्हा अहमदशहाच्या नेतृत्वाखाली पलायन करून ती पुन: आपल्या मूळ प्रदेशांत आली. या गोष्टीमुळे अब्दालीच्या अफगाण सैन्यांतील लोक जास्त संचलनशील झाले व राहिले होते; आणि असे लोक स्थिरपद झालेल्या शेतक-यांच्या  राष्ट्राला केव्हाही भारी ठरतात, असा इतिहासाचा धडा आहे. मुख्यत: धर्माच्या रक्षणासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठय़ांनी क्षत्रियकाय अंगीकारिले होते, तरी मराठय़ाला आपल्या शेतावर व मुलांमाणसांत घरी बसण्यात जे समाधान वाटते, ते घराबाहेर भटकण्यात वाटत नव्हते, हे शंभर वर्षांचा त्यांचा इतिहास बोलतो. वर्षांतून काही काळ घराबाहेर राहण्याची सवय त्यांनी पानिपतकाळी केली होती, तरीही चरितार्थ चालविण्याची ती एक सोय असेच मराठे मानीत. सगळीकडे रक्त सांडीत हिंडण्यात त्यांना आनंद नव्हता. मराठय़ांसारख्या अगदी कमी रक्तपाताच्या मोहिमा कोणीच केल्या नसतील. पोटापुरते पैसे मिळाले की, नंतर शत्रूचा अगदी नायनाट किंवा कायम बंदोबस्त करण्याची त्यास घृणा वाटे. ते घरी परतण्यासाठी उत्सूक असत. युद्ध ही एक न टाळण्यासारखी आपल्या पोटाच्या धंद्यातील बाब, असेच ते समजत. आपले शक्य तितके कमी लोक मरावेत, हे जसे त्यांस वाटे, तसे इतरही उगाच मारू नयेत, असाही त्यांचा भाव होता; यामुळेच पानिपताच्या युद्धात पराभव झाल्यानंतर जी अकारण अमानुष कत्तल दुराम्यांनी केली, ती मराठय़ांच्या मनाला फार लागली. इतकी की, ‘पानिपत’ हा शब्द तत्काळ त्या विशिष्ट अर्थाने त्यांच्या भाषेत रूढ झाला. सन १७६६ च्या एका पत्रात ‘वाबले, बुले, राजवले, लांभाते यांसि दुसरे पाणपत जाले’ असे उद्गार काढलेले आढळतात.
                      या आज्ञेप्रमाणे मुकाबला करण्यासाठीच गुरू गोविंदसिंहाने शिखांना शस्त्रधारी बनविले. हिंदी राजकारणात शस्त्रधारणाचा हा जो धार्मिक दुरुपयोग केला जात होता तो थांबविण्यासाठी मराठय़ांनी स्वत: शस्त्र हातात घेतले. त्याखेरीज अन्य मार्ग दिसत नव्हता म्हणूनच त्यांनी या मार्गाचा अवलंब केला. एरवी उठल्यासुटल्या शस्त्राघात करण्याकडे  त्यांची नैसíगक प्रवृत्ति नव्हती. चिनी प्रवासी युआनच्वांग याने मराठय़ांचे हे एक वैशिष्टय़ म्हणूनच सांगितले आहे. अपमानाच्या भरपाईसाठीच ते शस्त्रधारण करतात, असे त्याने म्हटले आहे. अलीकडील काळात त्यांचा गनिमी कावा म्हणून जी युद्धपद्धति रुढ झाली, तिचाही  हेतू प्रत्यक्ष रक्तपाताशिवाय डावपेचानेच इष्टकार्य साधण्याचा होता. ही पद्धति सोडून यवनांची पद्धति स्वीकारली, हाच भाऊवर नाना फडणिसासारख्यांचासुद्धा आक्षेप आहे. ज्या युद्धात शेवट अकारण रक्तपातात होतो असे युद्ध त्यास नको होते.
                  ते कसेही असो. पानिपताबद्दल बोलावयाचे तर असे कबूल करणे भाग आहे की, भौतिकदृष्टय़ा मराठय़ांचा उणेपणा या लढाईने उघडा पडला, पण नीतिदृष्टय़ा पहाता त्यांचे वर्तन आक्षेप न घेण्यासारखे अगदी स्वच्छ आहे. हॉब्ज या इंग्रज राजनीतिशास्त्रकाराच्या विवेचनाकडे पाहिले तर युद्धे तीन गोष्टींसाठी होत असतात. भौतिक फायदा, भीति व कीर्ति या त्या गोष्टी होत. अर्थात हे वर्गीकरण मागासलेल्या जगाला शोभण्यासारखे आहे. अबदालीशी लढण्याचा निश्चय करण्यात मराठय़ांचा आर्थिक फायदा नव्हता, अफगाणांचे भयही त्यांना बाधत नव्हते, तसेच केवळ कीर्तीसाठी युद्ध करण्यास ते कधीच तयार झाले नसते. भाऊ- बखरकाराने परतूडचा वाद रंगविताना भाऊसाहेबांच्या तोंडी  मर्यादा सोडून केलेले उत्तर म्हणून ‘एवढे कर्म हे कीर्तीसाठी करावे’ असे शब्द घातले आहेत; पण ते येथे लागू पडण्यासारखे नाहीत, कारण भाऊ हा कीर्तीसाठी काहीही करू म्हणणारा नव्हता. राज्यरक्षणासाठी आवश्यक, मराठय़ांच्या राज्याचे आर्थिक नुकसान बंद पाडण्यासाठी जरूर, म्हणूनच उत्तरेकडील मोहीम त्याने स्वीकारली असावी. मग मराठे कशासाठी लढले म्हणावयाचे? अशासाठी की, दिल्लीची  पातशाही राखण्याचे जे कार्य त्यांनी करार करून अंगावर  घेतले होते, ते पार पाडण्यासाठी; आणि या वेळी अबदालीसुद्धा वर सांगितलेल्या तीन प्राथमिक कारणांसाठी लढण्यास उद्युक्त झालेला नसून, एका उच्च व त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठी तो हिंदुस्थानात हाल सोसून  राहिला होता. हे कर्तव्य हिंदुस्थानातील इस्लामचे रक्षण हेच होय. त्याजवळ असलेल्या वरचढ सामर्थ्यांमुळे त्याने जय मिळवून कीर्ति संपादली व मराठय़ांच्या भीतीपासून स्वत:स कायमचे मुक्त करून घेतले; पण आर्थिकदृष्टय़ा त्यास ही कर्तव्यपूर्ति महागातच पडली, हे परिणामावरून दिसते.

Saturday, January 8, 2011

           नमस्कार मित्रहो, आजपासून आम्ही  तुमच्याशी 'क्षितिजझेप' या ब्लॉगच्या  माध्यमातून संवाद साधणार आहोत.हा संवाद अगदी मनमोकळा असेल.मुख्यत: इतिहास,दुर्गभ्रमंती,प्रवासवर्णने हा जरी या ब्लॉगचा लोकप्रिय विषय असला तरी इतरही नवनवीन विषय आणि त्यावरील दर्जेदार लिखाण येथे समयानुरूप प्रस्तुत केले जाईल .समान विचारांनी प्रेरित झालेल्या बहुत जनांचे हे एक हक्काचे व्यासपीठ असेल.आपला दैदीप्यमान आणि समृद्ध इतिहास उत्तरोत्तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण सारे बांधील आहोत,तरुणांचा कल केवळ तीर्थक्षेत्राची  पायपीट करण्यापुरताच मर्यादित न राहता धारातीर्थक्षेत्रापर्यंत व्यापक व्हावा अशी आमची इच्छा आहे.त्यास्तव इतरही अनेक संघटना,मंडळ (विधायक काम करणारे)   यांना समवेत घेवून कार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
          जीवनातील वैविध्यपूर्ण पैलूंचे दर्शन होईल असे अर्थपूर्ण लिखाण करणे हाच एक उद्देश केंद्रस्थानी ठेवून आम्ही  वेळोवेळी  आपणांस ब्लॉगच्या या  माध्यमातून भेटत राहू.नियमित सातत्याने दर्जेदार लेखन करण्याचा  आमचा सदैव प्रयत्न राहील .आपल्या प्रतिक्रियांचे येथे सहर्ष स्वागत आहे.

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||