Total Pageviews

Saturday, January 8, 2011

           नमस्कार मित्रहो, आजपासून आम्ही  तुमच्याशी 'क्षितिजझेप' या ब्लॉगच्या  माध्यमातून संवाद साधणार आहोत.हा संवाद अगदी मनमोकळा असेल.मुख्यत: इतिहास,दुर्गभ्रमंती,प्रवासवर्णने हा जरी या ब्लॉगचा लोकप्रिय विषय असला तरी इतरही नवनवीन विषय आणि त्यावरील दर्जेदार लिखाण येथे समयानुरूप प्रस्तुत केले जाईल .समान विचारांनी प्रेरित झालेल्या बहुत जनांचे हे एक हक्काचे व्यासपीठ असेल.आपला दैदीप्यमान आणि समृद्ध इतिहास उत्तरोत्तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण सारे बांधील आहोत,तरुणांचा कल केवळ तीर्थक्षेत्राची  पायपीट करण्यापुरताच मर्यादित न राहता धारातीर्थक्षेत्रापर्यंत व्यापक व्हावा अशी आमची इच्छा आहे.त्यास्तव इतरही अनेक संघटना,मंडळ (विधायक काम करणारे)   यांना समवेत घेवून कार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
          जीवनातील वैविध्यपूर्ण पैलूंचे दर्शन होईल असे अर्थपूर्ण लिखाण करणे हाच एक उद्देश केंद्रस्थानी ठेवून आम्ही  वेळोवेळी  आपणांस ब्लॉगच्या या  माध्यमातून भेटत राहू.नियमित सातत्याने दर्जेदार लेखन करण्याचा  आमचा सदैव प्रयत्न राहील .आपल्या प्रतिक्रियांचे येथे सहर्ष स्वागत आहे.

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||४||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||५||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||६||

No comments:

Post a Comment